मुंबई – विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उमेदवारी अर्जात दाखवलेली संपत्ती आणि त्यांचे व्यवसाय यावरून ते नक्कीच मजूर नाहीत हे स्पष्ट आहे. त्यांनी अपुरी माहिती देऊन जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी मुंबई बॅंकेच्या संचालकपदाचा तसेच विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा द्यावा. तसेच सहकार विभागाने दरेकर यांना सहा वर्षे कुठल्याही सहकारी संस्थेची निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे व प्रदेश संयोजक रंगा राचुरे यांनी म्हटले आहे की, दरेकर हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे गेली अनेक वर्षे मजूर प्रवर्गातून प्रतिनिधित्व करत होते. आता ते किती खरे मजूर आहेत हे राज्यातील जनतेला ठाऊक आहे.
याही वेळी त्यांनी सर्वपक्षीय सांगड घालत पुन्हा मजूर आणि नागरी बॅंक प्रवर्गातून उमेदवारी दाखल केली. आम आदमी पक्षाने त्यांच्या मजूर असण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे, सहकार विभागाने दरेकर यांना नोटीस बजावत त्यांच्या मजूर असण्याबद्दल स्पष्टीकरण विचारले आहे. ते मजूर नाहीत हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देणे हेच उचित ठरेल असे आपने स्पष्ट केले आहे.