पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका
पिंपरी – महापालिका हद्दीत कचरा संकलन करण्यासाठी चारचाकी गाड्या तसेच ठिकठिकाणच कचरा उचलण्यासाठी मोठ्या डंपिंगच्या गाड्या आहेत. शहरातील मुूख्या रस्त्यांवरून ही वाहने कचरा डेपोकडे कचरा वाहतूक करण्यासाठी प्रवास करत असतात. परंतु ही वाहतूक शहरवासीयांसाठी धोकादायक ठरत आहे. या वाहनातून कचरा नेताना कचरा योग्य प्रकारे झाकला जात नाही. तसेच या वाहनाच्या मागे प्रवास करणाऱ्या वाहनचालकास दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहनातून कचऱ्याची वाहतूक करताना तो झाकून नेहेला जात नाही. त्यामुळे कचरा गाडीच्या मागे प्रवास करणाऱ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या वाहनातून वाऱ्यामुळे कचरा बाहेर येतो. प्लॅस्टिक कागद उडून जातात. ते कागद दुचाकी चालकाच्या तोंडावर आला तर अपघात होऊ शकतो. तसेच कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीच्या मागच्या बाजूलादेखील मोठ मोठ्या पिशव्या ठेवल्या जातात. त्यामुळे वाहतुकीचे संकेत देणारे दिवे दिसत नसल्याने मागील वाहनचालक संभ्रमात पडत आहेत. यावर महापालिका प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
वाहनचालकांसाठी धोकादायक ठरतोय तुटलेला चेंबर
पिंपळे सौदागर – शिवार चौकातून औंधकडे जाणाऱ्या रस्त्यात चेंबरचे झाकण तुटल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या चेंबरच्या झाकणावरील सिमेंट निघून गेल्यामुळे लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या वाहनांना नुकसान होत आहे. तसेच वाहनचालकांचा अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन येथील चेंबर दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.
– बी. एन. राजे
सार्वजनिक स्वच्छतागृहात विजेची व्यवस्था करा
चिंचवड – येथील केशवनगर येथे महापालिकेची शाळे आहे. तेथे अभिनव चौकाजवळ महापालिकेने स्वच्छतागृह उभारले आहे. त्या स्वच्छतागृहात विद्युत व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळेस स्वच्छतागृहात प्रवेश करायचा असेल तर नागरिकांना स्वतःच्या मोबाइलची बॅटरी लावावी लागत आहे. येथे अंधार असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहाचा त्यांनाच वापर करता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन येथे लाइटची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
– सां. रा. वाठारकर, चिंचवड.