पुणे – “लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू झाल्यावर देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीच्या गरजेनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध होईल. त्यासाठी येथील कामांना गती द्यावी. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीच्या दृष्टीने पुणे विमानतळावरील धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी सर्व बाबींचा पैलूंचा अभ्यास करावा,’ असा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
पुणे विमानतळ येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यावेळी नवीन टर्मिनलसह आंतरराष्ट्रीय वाहतुक आणि पुरंदर विमानतळाबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके उपस्थित होते.
पाटील म्हणाले, “पुणे विमानतळवर सुरू होणाऱ्या नव्या टर्मिनलमुळे दहा पार्कींग बेज एरोब्रिज उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दिवसाला विमान फेऱ्यांची संख्या 218 पर्यंत पोहोचणार आहे. तसेच पुरंदर विमानतळाच्या कामाला गती देण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल.’
नव्या टर्मिनलमुळे प्रवासी संख्या वाढणार
पुणे विमानतळावरून दररोज सुमारे तीस हजार जण प्रवास करतात. त्यामध्ये जवळपास 540 प्रवासी हे आंतरराष्ट्रीय आहेत. त्यातच नव्याने साकारत असलेल्या टर्मिनलमुळे प्रवासी दुपटीने वाढतील, असा विश्वास संतोष ढोके यांनी व्यक्त केला. दरम्यान, 2022-23 मध्ये 59 हजार 451 विमानफेऱ्यांद्वारे 80 लाख प्रवाशांनी सेवेचा लाभ घेतला. तर यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत 31 हजार 591 विमानफेऱ्यांद्वारे 47 लाखाहून अधिक प्रवाशांनी लाभ घेतला, असे ढोके यांनी सांगितले.