रशियासुद्धा न्यूट्रॉन बॉम्ब बनवू शकेल
नवी दिल्ली, दि. 20 – रशियासुद्धा “न्युट्रॉन बॉम्ब’ निश्चितच बनवू शकेल. परंतु त्यांनी तो बनविण्यास सुरुवात केली आहे की नाही ते मात्र माहीत नाही, असे उद्गार अमेरिकेतील अण्वस्त्र तज्ज्ञ प्रा. थिडॉर टेलर यांनी काढले. ते सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. न्यूट्रॉन बॉम्बची प्राणघातक कक्षा सुमारे 1 किमी असते. गेली 20 वर्षे या बॉम्बसंबंधी अमेरिकेत संशोधन चालू आहे. रशियातही तसे चालू असण्याची शक्यता आहे.
नागालॅंडच्या बाबतीत तडजोड नाही
नवी दिल्ली – बंडखोर नागांना कोणतीही दया दाखविता कामा नये. जर त्यांनी पुन्हा बंडखोरी करण्याचा प्रयत्न करून निष्ठावान नागांना छळण्यास सुरुवात केली. तर त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आज लोकसभेत दिला. नागालॅंड हा भारताचाच भाग होता, आहे व यापुढेही राहणार आहे. याबाबतीत तडजोड शक्य नाही, असे पंतप्रधान मोरारजीभाईंनी ठामपणे जाहीर केले.