वॉशिंग्टन – वॉशिंग्टनला जोरदार चक्रिवादळाचा तडाखा बसल्यामुळे किमान एक हजार विमान उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. चक्रिवादळामुळे किमान 11लाख नागरिकांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. गारपिट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह काही ठिकाणी विजा पडल्या आहेत. हे चक्रिवादळ आता अमेरिकेच्या पूर्वेकडे सरकले आहे.
राष्ट्रीय वातावरण सेवेने वॉशिंग्टन डी.सी. च्या परिसरामध्ये चक्रिवादळाबाबतचा इशारा जारी केला आहे. वादळाबाबतचा विशेष इशारा आज सकाळी देण्यात आला. त्यामध्ये रात्री 9 नाजेपर्यंत वादळाची स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या वादळामुळे सार्वजनिक मालमत्तेच्या हानीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. गारांसह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची किंवा त्याही पेक्षा अधिक जोरदार वादळाची भीती देखील वर्तवण्यात आली आहे.
या वादळाचा प्रभाव अमेरिकेतील टेनेसी पासून न्यूयॉर्कपर्यंतच्या 10 राज्यांमध्ये जाणवतो आहे. सोमवारी दुपारी एकूण 29.5 दशलक्ष नागरिकांना या वादळाचा प्रत्यत्र किंवा अप्रत्यक्ष तडाखा जाणवल्याचे राष्ट्रीय वातावरण सेवेने म्हटले आहे. अंगावर झाड पडल्यामुळे 15 वर्षांचा एक मुलगा आणि वीज पडल्यामुळे 28 वर्षांचा युवक ठार झाले आहेत.
अनेक विमानांचे मार्ग पूर्वेच्या किनारपट्टीकडून वळवण्यात आले आहेत. अध्यक्ष ज्यो बायडेन यांनाही ऍरिझोना, न्यू मेक्सिको आणि उटाहच्या दौऱ्यासाठीचा प्रवास 90 मिनिटे उशीराने करावा लागला, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.