पिंपरी – महावितरणने पिंपरी-चिंचवड शहरातील 12 हजार 60 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. शहरातील लघुदाब घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक 2 लाख 19 हजार 263 वीजग्राहकांकडे बिलांची 78 कोटी 43 लाखांची थकबाकी आहे.
शहर आणि परिसरासाठी महावितरणचे पिंपरी व भोसरी असे दोन विभाग आहेत. या दोन्ही विभाग कार्यालयांतर्गत घरगुती 1 लाख 85 हजार ग्राहकांकडे 47 कोटी 52 लाख, वाणिज्यिक 27 हजार 257 ग्राहकांकडे 19 कोटी 43 लाख आणि औद्योगिक 6 हजार 693 ग्राहकांकडे 11 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीचा भरणा न केल्यामुळे गेल्या महिनाभरात 12 हजार 60 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामध्ये 2 हजार 227 ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित केला आहे.
या मोहिमेत थकबाकीमुळे पुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित जोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरू आहे. तसेच सायंकाळनंतरही विशेष तपासणी करण्यात येत आहे. या दोहोंमध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर आढळल्यास शेजारी आणि वीज वापरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच भोसरी एमआयडीसीमधील प्रिसिशन टेक्नॉलॉजी ऍण्ड हिट हिटर्स या औद्योगिक ग्राहकाने मंजूर जोडभारापेक्षा अधिक वीज वापरत तसेच मीटरमध्ये फेरफार करून गेल्या सात महिन्यांमध्ये 1 लाख 10 हजार 490 युनिटची म्हणजे 16 लाख 79 हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. वीजचोरी व दंडाचे या ग्राहकास 40 लाख 19 हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे
घरबसल्या वीज बिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना महावितरणची वेबसाइट आणि मोबाइल ऍपद्वारे ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक आणि घरगुती ग्राहकांचे वीज बिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
– निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण