व्हॅटिकन सिटी : पोप फ्रान्सिस यांची कोरोना विषाणूंची चाचणी नकारात्मक आली आहे, असे इटालीयन वर्तमानपत्र मेस्सागेरोने म्हटले आहे.
पोप यांना गेले काही दिवस ताप येत आहे. या 83 वर्षीय धर्मगुरूस खोकला आणि सर्दीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली असावी अशी भीती व्हॅटिकनसीटीमध्ये व्यक्त होऊ लागली.
फ्रान्सिस यांनी त्यांच्या पोप पदाच्या कार्यकाळात या रविवारी प्रथमच लेंट रेट्रीट हा कार्यक्रम रद्द केला. गेले आठवडाभर त्यांनी आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. मात्र मेस्सागेरोच्या बातमीत त्यांची कोरोना चाचणी कधी घेतली याचा उल्लेख नाही. याबाबत व्हॅटिकनचे प्रवक्ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
चीनमधून कोरोना विषाणूंची साथ जगभर पसरली आहे. इटलीमध्ये दोन हजार जणांना बाधा झाली असून 52 जणांचे मृत्यु झाले आहेत.