कँडी( श्रीलंका) – कुसल मेंडिस आणि धनंजया डी सिल्वा यांच्या अर्धशतकी खेळीनंतर एंजेलो मॅथ्यूजच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्टइंडिजचा 6 धावांनी पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह श्रीलंकेने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. एंजेलो मॅथ्यूज सामनावीर तर वाणिदु हसरंगा हा मालिकावीर ठरला.
Sri Lanka completed a 3-0 clean-sweep of their ODI series over Windies with a 6-run victory in Pallekele. #SLvWI pic.twitter.com/HG5YahKxXo
— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) March 1, 2020
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सर्वबाद 307 अशी मजल मारली होती. श्रीलंकेकडून फलंदाजीत कुसल मेंडिसने सर्वाधिक 55(48), धनंजया डी सिल्वाने 51(47), कुसल परेराने 44(55) आणि दिमुथ करूणारत्नेने 44(54) धावांची खेळी केली. वेस्टइंडिजकडून गोलंदाजीत अलजारी जोसेफ याने सर्वाधिक 4, जेसन होल्डरने 2 तर शेल्डन काॅटरेल, राॅसटन चेज आणि काईरान पोलार्ड याने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरात, वेस्टइंडिजला 50 षटकांत 9 बाद 301 धावसंख्येपर्यतच मजल मारता आली आणि त्यांना 6 धावांनी पराभव पत्करावा लागला. वेस्टइंडिजकडून सलामीवीर शाइ होपने 72(88), सुनिल एम्र्बिसने 60(60), निकोलस पूरनने 50(61) आणि काईरान पोलार्डने 49(50) धावांची खेळी केली पण संघास विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले.
श्रीलंकेकडून एंजेलो मॅथ्यूज याने 10 षटकांत 59 धावा देत सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर, इसुरू उदाना आणि वाणिदु हसरंगा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. वेस्टइंडिजचे तीन फलंदाज (राॅसटन चेज, हेडन वाल्श आणि डॅरेन ब्रावो) धावबाद झाले.