शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) येथे प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या गणेशमूर्तींना बंदीचा निर्णय घेण्यात आला. गावामध्ये जे मूर्ती व्यावसायिक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची विक्री करतील. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र व्यावसायिकांना देण्यात आले आहे. नदीपात्रात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनास देखील बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
येथील इंद्रायणी ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा पूजा दीपक भुजबळ यांनी नदीपात्रातील तब्बल दोन हजारांहून अधिक गणेशमूर्ती बाहेर काढल्या आहेत. गेली तीन वर्षे या संख्येंत वाढ होत असल्याचे देखील पूजा भुजबळ यांनी सांगितले. त्यानंतर पर्यावरणास घातक पिओपी मूर्तींना बंदीचा निर्णय ग्रामसभेत ठराव करून घेण्यात आला होता. त्यामुळे गणेश मूर्ती विक्रेते व्यावसायिक, सार्वजनिक गणेश मंडळे यांच्यासाठी पूर्वसूचना म्हणून सरपंच जयश्री भुजबळ यांनी लेखी पत्र सर्व व्यावसायिकांना दिले आहे. गावातील सर्व नागरिक या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहेत. शिक्रापूर येथील वेळ नदीमध्ये कोणत्याही प्रकारची प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीं विसर्जित होऊ देणार नाही, अशी व्यवस्था करीत असल्याचे माजी सरपंच रामराव सासवडे यांनी सांगितले. शिक्रापूर ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचे परिसरातील गावांनी अनुकरण करावे, असे शिक्रापूर पोलिसांनी केले आहे.