जम्मू – जम्मू-काश्मीरमधील स्थानिक निवडणुका लढवण्याचा निर्णय बहुतांश राजकीय पक्षांनी घेतला आहे. जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष राज्याचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत निवडणुका न लढवण्याचा निर्णय आधी भाजपेतर पक्षांनी घेतला होता. मात्र, आता ते निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सरसावले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदा आणि रिक्त सरपंच, पंच पदांसाठीच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्या निवडणुका 1 ते 24 डिसेंबर या कालावधीत आठ टप्प्यांत होणार आहेत. त्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय पीपल्स अलायन्स या सात राजकीय पक्षांच्या आघाडीने घेतला आहे. त्या आघाडीमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांसारख्या प्रमुख पक्षांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा परत मिळवून देण्याच्या उद्देशातून राजकीय लढा देण्यासाठी ती आघाडी स्थापन करण्यात आली आहे. अजूनपर्यंत आघाडीत सहभागी व्हायचे की नाही याविषयीचा निर्णय न घेतलेल्या कॉंग्रेसनेही स्थानिक निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे.
केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजपच्या घटनाबाह्य धोरणांना विरोध करण्यासाठी त्या निवडणुका लढवण्याचे सूतोवाच कॉंग्रेसकडून करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक निवडणुकात होत असतील तर विधानसभा निवडणुका का घेतल्या जात नाहीत, असा सवालही त्या पक्षाने केला आहे.