इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये वाढीव वीजबिलांविरोधात सुरू झालेल्या आंदोलनामध्ये आता राजकीय पक्षही सहभागी झाले आहेत. या आंदोलनात आता आवामी नॅशनल पार्टी, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि अन्य स्थानिक राजकीय पक्षही सहभागी झाले आहेत. या राजकीय पक्षांनी खैबर पख्तुन्वामधील काही शहरांमध्ये निदर्शने करून वाढीव वीज बिलांविरोधी निदर्शने करायला सुरुवात केली आहे.
पेशावर डेव्हलपमेंट ऍथोरिटीबाहेरही जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यावेळी सरकार आणि वीज वितरण कंपन्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वीजेवर अवास्तव कर लावणे बंद केले गेले नाही,
तर सरकारच्याविरोधात असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. खालावलेल्या आर्थिक स्थितीमध्ये वीज ग्राहकांना ही वाढीव वीज बिले परवडणारी नाहीत.
वीज बिलांची जबरदस्तीने वसूली करण्यात येऊ नये, अशी मागणीही यावेळी केली गेली. भवालनगर, लह्याल आणि लाहोरमध्येही अशी निदर्शने झाली.
काळजीवाहू पंतप्रधान अन्वरउल हक काकर यांच्या आदेशांनुसार उर्जा मंत्रालयाने वीज बिले कमी करण्यासाठी काही शिफारसी तयार केल्या असून येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यावर विचार केला जाईल, असे माहिती मंत्री मुर्तझा सोलंगी यांनी सांगितले.