मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भगवान श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे.
‘आदिपुरुष’चं पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘आदिपुरुष’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. कुठे प्रेक्षक चित्रपटावर टीका करत आहेत तर कुठे चित्रपटविरोधात थेट दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय.
यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. दरम्यान, आता हाच मुद्दा पकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या धिकृत ट्विटवर अकाउंटवर ‘आदिपुरुष’ चित्रपटाशी संबंधित दोन फोटो शेअर केले होते.
तसेच या चित्रपटाचं त्यांनी प्रमोशनही केलं होतं. परंतु आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर वाद निर्माण झाल्यामुळे देवेंद्र फडणवीसांवरही संजय राऊत यांनी निशाणा साधला असल्याचं दिसून आलं आहे. यावेळी राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, “मागे एक चित्रपट आला होता, त्यातल्या अभिनेत्रीने भगवी बिकनी घातली होती, तेव्हा या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी हिंदुत्त्वाच्या नावाखाली मोठा हंगामा केला होता. परंतु आता एका चित्रपटात ज्या प्रकारे हिंदुत्वाची नौटंकी आणि तमाशा बनवला आहे, त्यावर हे लोक काहीच बोलत नाहीत, हे यांचं ढोंग आहे.
यांच्या मते तेव्हा हिंदुत्व धोक्यात होतं मग आता यांचं हिंदुत्व धोक्यात नाही येत का? या चित्रपटात ज्या प्रकारचे संवाद आहेत, जी दृष्यं आहेत त्याने लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, लोकांमध्ये त्याबद्दल रोष आहे. त्यामुळे यावर कारवाईसाठी तुमच्याकडे कोणताही कायदा नाही का? हे लोक रामाच्या नावाखाली ढोंग दाखवत आहेत. यांचं रामायणच नकली आहे.’ असं संजय राऊत यावेळी म्हणाले.