श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील सात राजकीय पक्षांच्या आघाडीत मंगळवारी फूट पडली. पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन यांनी आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा परत मिळावा यासाठी लढा देण्याच्या उद्देशातून नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी (पीडीपी) आणि इतर पाच पक्षांनी हातमिळवणी केली. त्यांनी पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन या नावाने आघाडी स्थापन केली.
त्या आघाडीचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यानंतर आघाडीने काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवल्या. त्यामध्ये आघाडीने चांगले यशही मिळवले. त्यानंतरही आघाडीत पूर्ण मनोमिलन झाले नसल्याचे एक पक्ष बाहेर पडल्याने स्पष्ट झाले.
घटक पक्षांमध्ये एकमेकांबद्दल विश्वास नसल्याचे कारण देत लोन यांनी त्यांचा पक्ष बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकांत आघाडीच्या घटक पक्षांनी एकमेकांविरोधात छुप्या पद्धतीने उमेदवार दिल्याचा आरोपही त्यांनी केला.