-->

“…परंतु महाराष्ट्र सरकारचे हलेडुले सुरू आहे” ; लसीकरणावरून भाजपच्या ‘या’ नेत्याची राज्य सरकारवर टीका

मुंबई : देशात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोणत्या राज्याने आतापर्यंत किती जणांना लस दिली याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हा आठव्या क्रमांकावर आहे. यावरूनच भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

“कोविडची लस तयार आहे, परंतु महाराष्ट्र सरकारचे हलेडुले सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची मोहीम देशभरात सुरू असून या यादीत ठाकरे सरकारचा क्रमांक ८ वा आहे. फक्त टक्केवारीत नंबर वन,” असे म्हणत भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला.

अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केंद्र सरकारची एक यादी जाहीर केली आहे. १९ जानेवारी २०२१ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत देशभरातील कोणत्या राज्यात किती लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे याची माहिती यात देण्यात आली आहे. १९ जानेवारी २०२१ पर्यंत देशभरात ६ लाख ३१ हजार जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

यामध्ये पहिल्या क्रमांकावर कर्नाटक असून कर्नाटकात ८० हजार ६८६ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे तेलंगण आणि ओदिशाचा क्रमांक आहे. तर महाराष्ट्र या यादीत आठव्या क्रमांकावर असून १९ जानेवारी रोजी ही यादी प्रसिद्ध होईपर्यंत ३० हजार २४७ लोकांना ही लस देण्यात आल्याचं सांगितलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.