पेशावर – पाकिस्तानात इस्लामिक धार्मिक कट्टरपंथीयांचा पोलिओ लसीकरणाला विरोध असून हा विरोध अजूनही मावळलेला नाही. उत्तरपश्चिम पाकिस्तानात पोलिओची लस देण्यासाठी एक पथक गेले असता एका बंदुकधारी इसमाने त्या पथकावर गोळीबार केला त्यात एक जण ठार झाला.
तहरीक ए तालिबान या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तहरीक एक तालिबान आणि पाकिस्तान सरकार यांच्यात एक महिन्याच्या शस्त्रसंधीचा करार झाला होता. पण त्याची मुदत संपताच तहरीक ए तालिबानने केलेला हा पहिला हल्ला आहे.
खैबर पख्तुनवा प्रांतात तांक जिल्ह्यात हा हल्ला झाला. त्या प्रांतात सुमारे 65 लाख मुले आहेत. त्यांना पोलिओचा डोस देण्यासाठी पाच दिवसांचा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला होता. त्याचा आजचा दुसरा दिवस होता.
या पथकाला पोलीस संरक्षण देण्यात आले होते. परंतु तरीही हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एक पोलीस कॉन्स्टेबल ठार झाला आहे. तर दुसरा कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. पोलिओ लसीकरण पथकातील मात्र कोणी या हल्ल्यात जखमी झालेले नाही.