पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचे मतदान रविवारी (दि. 26) होणार आहे. मतदान प्रक्रिया भयमुक्त, निःपक्षपाती व्हावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता पिंपरी चिंचवड पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघात शहर पोलीस हद्दीतील सहा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. 87 मतदान केंद्रावर 510 बूथवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून 18 ठिकाणी संवेदनशील मतदान केंद्र आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीसांनी जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त लावला आहे. चिंचवड मतदारसंघात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन करून पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्रे जप्त केली. विविध गुन्ह्यांमधील 10 जणांना अटक केली आहे. मतदारसंघात 24 ठिकाणी 24 तास नाकाबंदी लावली आहे. संवेदनशील ठिकाणी 18 वेळा केंद्रीय पोलीस दलाच्या मदतीने संचलन करून, लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न पोलीस दलाकडून करण्यात आला. मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या गुन्हेगारांविषयी माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शस्त्र परवाना असलेल्या नागरिकांकडून 356 पिस्टल निवडणूक काळात पोलीस ठाण्यात जमा करुन घेण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळून व्यावसायिक दुकाने व आस्थापना बंद ठेवावीत, असे आदेश पोलिसांनी जारी केले आहेत.