कराड, -कराडमधील बारा डबरी परिसरातील शिंदे मळा येथे डॉक्टरच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याप्रकरणी कुलदीप सिंग व साका सिंग दोन परप्रांतीय संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरोड्याचा मुख्य सूत्रधार आणि अन्य संशयितांचा शोध अद्याप सुरू आहे.
याबाबत माहिती अशी, शिंदे मळ्यातील डॉ. राजेश शिंदे हे पत्नी पूजा आणि इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या मदतीने होलिस्टिक हिलिंग सेंटर चालवतात. या सेंटरच्या मागील बाजूस त्यांचा बंगला आहे. डॉ. राजेश शिंदे यांच्यावरील वैद्यकीय उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याने, त्यांनी पैसे जमा करायला सुरुवात केली होती. सेंटरमधून मिळालेली आणि नातेवाइकांकडून आणलेली 27 लाख रुपयांची रोकड आणि दागिने त्यांनी बंगल्यात ठेवले होते.
या बंगल्यावर सोमवारी (दि. 10) पहाटे सहा ते सात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. डॉ. शिंदे कुटुंबीयांना सुरा व चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी 27 लाखांची रोकड व 48 तोळे सोन्याचे दागिने लांबवले होता. या दरोडेखोरांनी कारमधून मुंबईच्या दिशेने पलायन केल्याची माहिती मिळताच पोलिसांची पाच पथके दरोडेखोरांच्या मागावर रवाना झाली होती. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ येथून एका दरोडेखोराला अटक केली होती. त्यानंतर आणखी एका दरोडेखोराला पोलिसांनी रविवारी पुण्यातून अटक केली. दरम्यान, संशयितांनी सहा महिने ते वर्षभर बंगल्याची रेकी करून दरोडा टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दरोड्याच्या तपासासाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पथके रवाना झाली आहेत. अटक केलेल्या संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दरोड्याचा मुख्य सूत्रधार व इतर दरोडेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी तपास करत आहेत.