- देहूरोडला दुकान मालकासह टेम्पो चालकावर कारवाई
- सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा
देहूरोड – देहूरोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील एका गॅस दुकानावर सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईमध्ये “गॅस रिफ्लिंग’चे साहित्य, छोटे-मोठे सिलेंडर, नोझल, मोबाईल जप्त करीत दुकान मालकासह टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. रविवारी (दि. 14) सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मंगेश शशिकांत मेटकरी (वय 25, रा. गुजरनगर, थेरगाव, वाकड, पुणे)हा दुकान चालक आणि प्रीतेश भारत कांबळे (वय 32, रा. बौद्धनगर, आंबेडकर वसाहत, निगडी) टेम्पो चालक यांच्याविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्थ पथकावर होते. त्यावेळी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉ. आंबेडकर मार्गावर सिद्धार्थ गॅस एजन्सी नावाच्या दुकानांमध्ये ज्वालाग्राही पदार्थाबाबत पुरेसा सुरक्षितता न बाळगता जाणीवपूर्वक जबाबदारी टाळून मानवी जीवितास धोका होईल, असे काम करीत असल्याची माहिती मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, पोलीस हवालदार सुनील शिरसाट, पोलीस नाईक अनिल महाजन, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, विष्णू भारती, गणेश कारोटे, दीपक साबळे, संगीता जाधव, कर्मचारी मारोतराव जाधव, सोनाली माने आदींनी दुकानावर छापा टाकला.
या कारवाईत गॅस रिफ्लिंगसाठी लागणारे साहित्य, एक लाख 9 हजार 250 रुपयांचा गॅसचा मुद्देमाल 350 रुपये रोकड, 450 रुपये किमतीचे एक लोखंडी गॅस ट्रान्सफर पीन तसेच 2 पितळी नोझल, 80 हजारांचा पे रिक्षा (एम. एच. 14 एफ. टी. 1582) 17 हजार रुपयांचे 2 मोबाईल असा 2 लाख 7 हजार 50 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दुकान चालक मिटकरी व टेम्पो चालक कांबळे यांना ताब्यात घेऊन देहूरोड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार तपास करीत आहेत.