हिंजवडी येथील प्रकार : हॉटेलमालकाने दिली तक्रार
पिंपरी – पोलीस असल्याचे सांगूनही सहकाऱ्याला दारु न दिल्याने एका पोलीस शिपायाने हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये गोंधळ घातला. हॉटेल मालकाला मारहाण करत शेजारील हॉटेलची तोडफोड करुन नुकसान केले. ही घटना रविवार (दि. 4) रात्री एक वाजताच्या सुमारास हॉटेल एफएमएल लॉन्स येथे घडली.
याप्रकरणी, रामकिसन रमेश खैरनार (वय-32, रा.आदर्शनगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, पुणे शहरातील पोलीस शिपाई अक्षय धुमाळ याच्यासह त्याचा साथीदार अजय खोत व इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री हॉटेल बंद झालेले असताना पोलीस शिपाई अक्षय धुमाळ हा त्याच्या तीन साथीदारांना घेऊन रात्री एक वाजताच्या सुमारास हिंजवडी येथील हॉटेल एफएमएल येथे आला.
त्याने फिर्यादी खैरनार यांना “आम्ही पोलीस आहोत, तू आमच्या माणसाला त्या दिवशी दारु का दिली नाही’ असे म्हणून फिर्यादी खैरनार यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.पोलीस कर्मचाऱ्यानेच दारु न दिल्याच्या कारणावरुन येथे राडा केला. तसेच परत जात असताना बाजूच्या चायनीज दुकानाला लाथ मारुन त्याची काच फोडून नुकसान केले. याप्रकरणात गुन्हा दाखल झाला असून अद्याप धुमाळ व त्याच्या साथीदाराला अटक केलेली नाही. अधिक तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भवारी करीत आहेत.