पिंपरी – पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधानसभा निवडणुका असल्यामुळे शहराध्यक्ष म्हणून नव्या कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी मागणी वरिष्ठ पातळीवर केल्याची चर्चा रंगल्याने भाजपाचा नवा शहराध्यक्ष कोण याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या शहराध्यक्षांची चर्चा रंगली आहे. नवा शहराध्यक्ष निवडला जाणार की जगताप यांच्याकडेच जबाबदारी राहणार, हे अद्याप निश्चित नसले तरी इच्छुकांनी मात्र मोर्चेबांधणीला सुरूवात केल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणूक जवळ आल्याने अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून आपणाला मोकळे करावे, जेणेकरून निवडणुकीसाठी पुरेसा वेळ मिळेल, अशी मागणी मागणी स्वत:हून जगताप यांनी केल्याचे पक्षीय पातळीवरून सांगितले जात आहे. जगताप चिंचवडमधून पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याने निवडणुका होईपर्यंत त्यांच्याकडे जबाबदारी राहणार की भाजपाला नवा शहराध्यक्ष मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.