कोल्हापूर – उद्या कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस आहे. हाच दिवस येथील मराठी बांधव काळा दिवस म्हणून पाळतात. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने कोल्हापूरच्या शाहू समाधी स्थळावरून मशाल प्रज्वलित करून रॅली काढण्यात आली आहे. दिवस वेदनेचा दौड मशालीचा हे घोषवाक्य घेऊन शिवसैनिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले आहेत.
यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. विशेष म्हणजे या सर्व शिवसैनिकांनी डोक्याला काळा पट्ट्या बांधून ही मशाल घेऊन कर्नाटकातील बेळगावकडे रॅली ने रवाना झाले आहेत. जिल्हाप्रमुख विजय देवणे , संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली निघालेली रॅली कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोल नाका परिसरात असणाऱ्या दूधगंगा पुलावरती अडवली.
त्यानंतर कर्नाटक पोलिस आणि शिवसैनिकात मोठी बाचाबाची झाली. मात्र कर्नाटक पोलिसांनी तुफान लावलेल्या बंदोबस्ता पुढे शिवसैनिकांनी थेट पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडला. जवळपास तासाभरापेक्षा अधिक काळ हा ठिय्या मांडलेला होता. यावेळी कर्नाटक पोलिसांच्या समोरच कर्नाटक विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अखेर शिवसैनिकांनी मशाल आणि भगवा ध्वज घेऊन थेट दुधगंगा नदीच्या पाण्यात उतरून नदीपार करत पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना अडवल.. मात्र कोणत्याही परिस्थितीत उद्या कर्नाटकात भगवा ध्वज फडकवण्यासाठी आणि कर्नाटकचा करण्यासाठी जाणार असल्याचा निर्धार शिवसैनिकाने केला आहे. यावेळी दूधगंगा पुलाच्या मधोमध कर्नाटक पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांचाही मोठा आणि कडेकोट बंदोबस्त तैनात होता.