पोलीस निरीक्षक रावसाहेब भापकर यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन

पुणे : शहर पोलीस दलातील पोलीस नियंत्रण कक्षेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रावसाहेब भापकर (वय ५४) यांचे गुरुवारी सायंकाळी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिवसभर पोलीस नियंत्रण कक्षात काम केल्यानंतर दुपारी २ वाजता ते वडगाव शेरी येथील घरी गेले होते. घरी त्यांना सायंकाळी ७
वाजण्याच्या सुमारास चक्कर आली व ते खाली पडले. घरातील लोकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले.

परंतु,उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. आपल्याबरोबर काही वेळापूर्वी काम करुन घरी गेलेल्या अधिकार्‍यांचे असे निधन झाल्याचे वृत्त समजताच नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांना धक्काच बसला. भापकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी त्यांच्या घरी धाव घेतली.

शांत, संयमी आणि मनमिळावू अधिकारी अशी रावसाहेब भापकर यांची ओळख होती. गेल्या ११ महिन्यांपासून ते पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत होते. त्यापूर्वी वानवडी पोलीस ठाण्यात त्यांची नेमणूक होती. चिंचवड पोलीस ठाण्यातही त्यांनी काही काळ काम केले होते. भापकर हे मुळचे नगर जिल्ह्यातील राहणारे होते.

Leave A Reply

Your email address will not be published.