राजगुरूनगर (प्रतिनिधी): खेड तालुक्यात आजही एक ५८ वर्षीय व्यक्ती करोना बाधित सापडली असून तालुक्यातील संख्या २० झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात करोना बाधितांच्या संख्येत वाढ होतच आहे. गेली तीन दिवसात खेड तालुक्यात १२ जण करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. हे सर्व मुंबई मधून आलेल्या व्यक्ती व त्यांच्या संपर्कात आलेले जवळचे नातेवाईक आहेत. मुंबईहुन गावाकडे आलेल्या व्यक्तीमुळे तालुका करोना बाधित होत चालला आहे. तालुक्यात आठ गावांमध्ये आता करोना फ़ैलावला आहे.बुरसेवाडी ता खेड येथे मुंबईवरून हि ५८ वर्षीय व्यक्ती आली होती तिचे मूळ गाव दुसरे आहे.हि व्यक्ती नातेवाईकाकडे राहत असून त्याच्या १५ जण संपर्कांत आल्याची प्राथमिक माहिती आहे. या सर्वाचे उद्या दि. २९ रोजी स्वब टेस्ट करण्यात येणार असल्याचे डॉ गाढवे यांनी सांगितले.
दरम्यान ५८ वर्षीय व्यक्तीला करोना झाल्याचा अहवाल खेड तालुका आरोग्य विभागाकडे आल्यानंतर,तहसीलदार सुचित्रा आमले, सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे,पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी बुरसेवाडी गावाला भेट देऊन खबरदारीच्या उपाययोजनांची ग्रामस्थांना माहिती दिली. करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरंटाईन करण्यात आले आहे. गावात करोना बाबत जनजागृती करून उद्या या गावात कंटेनमेंट झोन करण्यात येणार आहे. बुरसेवाडी मध्ये करोना पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या १५ व्यक्तींयांच्यासह इतर व्यक्तींचा शोध सुरु असून त्याना कोरंटाईन करण्यात आले आहे.
याबाबत सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितले कि, मुंबई मधून आलेल्या व्यक्ती नियम पाळत नसल्याने करोनाचा फ़ैलाव होत आहे. स्थानिक कमिटी याबाबत निष्काळजी पणा दाखवत असल्याने गावावर करोनाचे संकट ओढवले जात आहे. कमिटीतील सरपंच हा अध्यक्ष असतो तलाठी उपाध्यक्ष व ग्रामसेवक सचिव आहे मात्र त्यांच्या हलगर्जीपणामुळे गावागावात रुग्ण वाढत आहेत. ग्रामपंचायत सतर्कता बाळगत नाही. गावातील नागरिकांनी सतर्क राहून बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तीचा अहवाल आरोग्य विभागाकडे द्यावा, गावातील कमिटीला सूचित करावे. नियमांचे पालन करावे बाहेरगावावरून गावी आलेल्या व्यक्तींनी कोरंटाईन होऊन नियम पाळावेत असे आवाहन केले आहे