आपत्ती व्यवस्थापन कक्षात असतील पोलीस, अग्निशमन दल कर्मचारी

पावसाळ्यातील संभाव्य घटना लक्षात घेऊन कार्यवाही 

पुणे – पावसाळ्यात शहरात उद्‌भवणाऱ्या संभाव्य आपत्तीजनक स्थितीशी सामना करण्यासाठी यंदापासून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात पोलीस आणि अग्निशमन दलाचा प्रत्येकी एक कर्मचारी 24 तास उपलब्ध असणार असणार आहे. त्यासाठी आवश्‍यक वायरलेस यंत्रणा उभारण्यात आली असून सोमवारपासून हे कर्मचारी कार्यरत असतील.

पावसाळ्यात खडकवासला धरण भरल्यानंतर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येते. त्यामुळे विठ्ठलवाडी, म्हात्रेपूल, दत्तवाडी, राजपूत झोपडपट्टी, कामगार पुतळा परिसर यांसह काही भागात पावसाचे पाणी शिरते. याशिवाय, शहरात मोठ्या प्रमाणात जुने वाडे असल्याने ते कोसळण्याच्या घटना घडण्यासह इतर अपघातही घडतात. यावेळी मदतकार्य तसेच उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडून मुख्य इमारतीत पावसाळ्यासाठी 24 तास सुरू असणारा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.

या कक्षाकडे दुर्घटनेची माहिती आल्यानंतर प्रशासनाकडून अग्निशमन दल तसेच पोलिसांना ही माहिती कळविली जाते. मात्र, अनेकदा या संपर्कात अडथळे निर्माण होऊन मदतकार्यास उशीर होतो. परिणामी, नागरिकांच्या रोषाचा सामना प्रशासनाला करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पावसाळी आपत्ती स्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका, पोलीस, पाटबंधारे विभाग तसेच अग्निशमन दलाच्या संयुक्‍त बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या पुढे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात पोलीस कर्मचारी, तसेच अग्निशमन दलाचा कर्मचारीही कार्यरत असणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नियमितपणे संपर्क यंत्रणा ठेऊन दुर्घटना अथवा अपघाताच्या वेळी तातडीने मदत कार्यासाठी उपाय योजना केल्या जाणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.