निर्माल्याचा ‘कचरा’

निर्माल्याचा “कचरा’ कलश गायब : निर्माल्य टाकण्यासाठी सुविधाच नाही

पुणेकर सुधारले; महापालिका कधी सुधारणार?

संकलनासाठी सुविधा नाही

शहरात मोठया प्रमाणात गणेश मंदिरे तसेच इतर मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये दररोज हजारो किलो निर्माल्य निघते, हे निर्माल्य संकलित करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी गणेश मंडळे तसेच मंदिरांच्या व्यवस्थापनांकडून करण्यात आली आहे. मात्र, पालिकेकडून केवळ गणेशोत्सव तसेच नवरात्रीमध्येच ही सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे चित्र असून गणेश मंडळांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पुणे – वाढते नदीप्रदूषण रोखण्यासाठी पुणेकरांनी घर तसेच मंदिरातील निर्माल्य नदीत टाकू नये, असे आवाहन महापालिकेने पुणेकरांना केले. त्यासाठी काही वर्षे हे निर्माल्य संकलन करण्यासाठी प्रमुख पुलांवर निर्माल्य कलशही ठेवण्यात आले होते. मात्र, आता पुणेकर महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत असतानाच; हे निर्माल्य कलश गायब असल्याने निर्माल्य कचऱ्यासारखे पडून आहे. त्यामुळे नागरिक सुधारले असले, तरी आता महापालिका सुधारण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे.

शहरात नदीकाठच्या परिसरात प्रमुख मंदिरे आहेत. तसेच घरातील पूजेचे निर्माल्य नदीत टाकले जात होते. त्यामुळे नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून सर्व प्रमुख पुलांवर निर्माल्य कलश ठेवण्यात आले. तसेच त्या ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आले. निर्माल्य नदीत न टाकता या कलशात टाकण्याचे आवाहन करण्यात आले. सुरूवातीला याला नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, आता नागरिक स्वत: यासाठी पुढाकार घेत असून महापालिकेने पुलांवर ज्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले होते त्या ठिकाणी नागरिक प्लॅस्टिकच्या पिशवीत अथवा कागदामध्ये गुंडाळून एका जागी व्यवस्थीत हे निर्माल्य ठेवत आहेत.

मात्र, महापालिकेकडून ते नियमितपणे उचलले जात नसल्याने राजारामपूल, म्हात्रेपूल, बालगंधर्व पूल, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पूल, एस.एम जोशी पुलाच्या मध्यभागावर हे निर्माल्याचे ढीग साचून असतात. त्यातच, नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने तसेच मोकाट जनावरे खाण्याच्या शोधात हे निर्माल्य अस्ताव्यस्त करत असल्याने ते कचऱ्यासारखे पडून आहे. परिणामी नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असून महापालिकेच्या कलश ठेवण्याच्या अनास्थेमुळे नागरिक पुन्हा नदीत निर्माल्य टाकण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेने तातडीने निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.