पिंपरी – कामात बढती, रजा, वेतनवाढ, बदलीसाठी, वैद्यकिय आदी कामांमध्ये दप्तर दिरंगाई होत आहे. याचा थेट परिणाम आमच्या कामगिरीवर होत आहे, वारंवार निवेदन देऊनही कार्यवाही होत नाही. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यावर लिपिकांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करीत स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी समस्या सोडविण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 28) निगडी येथे पोलीस मुख्यालयात पोलीस दरबार झाला. पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त सतीश माने, पद्माकर घनवट उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी केलेल्या आवाहनानुसार 33 तक्रारी प्राप्त झाल्या. तर 14 जण ऐनवेळी आपली कैफियत मांडण्यासाठी हजर झाले होते.
स्वतः किंवा कुटूंबातील सदस्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. सरकारी नियमाप्रमाणे या उपचाराचा खर्च मिळण्यासाठी त्यांनी आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाकडे बिले सादर केली. तसेच रजा काळातील वेतन मिळावे, अशी विनंती केली. त्यातील त्रुटींची पूर्तता देखील केली. मात्र आठ ते नऊ महिने होऊनही त्यांना वैद्यकीय बिलाचे पैसे मिळाले नाहीत. काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, पदोन्नती याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला नाही. जिल्हांतर्गत बदलीच्या अर्जांचीही अडवणूक केली असल्याच्या तक्रारी पोलिसांनी मांडल्या.
सव्वा वर्षापासून बिनपगारी
गेल्या 15 महिन्यांपासून पगार मिळत नसल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. इतर जिल्ह्यातून बदलून आलेले काही पोलीस निरीक्षक अतिरिक्त असल्याने त्यांनाही वेतन मिळालेले नाही. त्यांनीही समस्या मांडली. त्यांना त्वरित पोलीस वेल्फेअर फंडातून वेतन देण्यात यावे, असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. काही महिला कर्मचाऱ्यांनीही बदलीची विनंती केली. समस्या मांडताना काही पोलिसांना भावना अनावर झाला.
मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत नाराजी
कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या विविध तक्रारींमुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनीही नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांची इतकी प्रकरणे प्रलंबित कशी राहू शकतात, असा प्रश्न त्यांनी प्रशासनातील संबंधित मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना केला. या तक्रारींबाबत सोमवारी (दि. 31) आढावा घेऊ, असे आयुक्तांनी सांगितले. किरकोळ कामासाठीही काही पोलिसांची अडवणूक होत असल्याचे ऐकून आयुक्तांनी कपाळाला हात लावला.