- पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची माहिती
- करोना मुक्तीसाठी रस्त्यावर उतरणार
लोणी काळभोर (पुणे) – आगामी काळात विनामास्क फिरणारे व पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर दंड आकारणीबरोबरच, कारवाई करावी, असे आदेश पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिले आहेत. यापुढील काळात कायदा व सुव्यस्था राखण्याबरोबरच, करोना मुक्तीसाठीही पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विनामास्क बाहेर पडणारे अथवा पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर दंड आकारणीबरोबरच, कारवाई करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या होत्या; मात्र जिल्ह्यातील काही अपवाद वगळता बहुतांश ग्रामपंचायतीनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचे पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर नूतन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यापुढील काळात कारवाईचे अधिकार पोलिसांना सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.
अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पोलिसांना रस्त्यावर उतरण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सुचनेनुसार ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रातील हद्दीमध्ये जे नागरिक चेहऱ्यावर मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी थांबलेले असताना व गाडी चालवत असताना आढळून आल्यास अथवा सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसुन आल्यास व्यक्तींकडून जागेवरच पाचशे रुपयांचा दंड वसुल करण्यात येणार आहे. तर वरील नियमांचा वारंवार भंग करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलीस अधिकारी, होमगार्ड अथवा विशेष पोलीस अधिकारीही यापुढील काळात कारवाई करू शकणार आहेत.
- पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर ते 15 नंबर या दरम्यान बेकायदा भरणाऱ्या भाजीपाला बाजाराबद्दल बोलतांना संदीप पाटील म्हणाले, बेकायदा भाजीपाला बाजार भरत असल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक विक्रेतेच बसत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे लोणी काळभोर पोलिसांनी बेकायदा भाजीपाला बाजारातील विक्रेत्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.