पुणे- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात चार धरणे मिळून एकूण पाणीसाठा 98.48 टक्के म्हणजे 28.71 टीएमसी झाला आहे. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीन धरणे 100 टक्के भरली आहे, तर टेमघर धरण भरण्याच्या मार्गावर असून या धरणात 88 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या परिसरात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. दि. 1 जूनपासून आजपर्यंत खडकवासला धरण परिसरात 641 मिमी पाऊस झाला आहे. पानशेतमध्ये 1 हजार 870 मिमी, वरसगावमध्ये 1 हजार 792 आणि टेमघर धरणात 2 हजार 505 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
पानशेत धरणातून पॉवर हाऊसमधून 600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर खडकवासला धरणातून कालव्याद्वारे 1 हजार 54 क्युसेकने आणि धरणातून 856 क्युसेकने पाणी नदीत सोडले जात आहे. खडकवासला धरणात 1.97 टीएमसी, पानशेतमध्ये 10.65 टीएमसी, वरसगावमध्ये 12.82 टीएमसी आणि टेमघर 3.26 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.