कामशेत – कामशेत येथे अवैधरित्या गांजाचा साठा करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लाखो रुपयांचा गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक नवनीत कावत यांनी दिली.
कामशेत येथे अवैधरित्या गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक नवनीत कावत यांनी 21 जुलै छापा टाकला. त्यावेळी घरातून तब्बल 80 लाख 77 हजार 500 रुपयांचा 578.5 किलो गांजा जप्त केला होता. या कारवाई दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष रामचंद्र वाळुंज (रा. पंचशील कॉलनी, कामशेत) हा पसार झाला होता.
पोलीस उपअधीक्षक कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी व त्यांच्या पथकाने 5 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजता संगमनेर (अहमदनगर) येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याला गांजाचा पुरवठा त्याचा साथीदार महेश राजू पंचारिया (रा. कासार धुमाळा, संगमनेर, अहमदनगर) हा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महेश पंचारिया याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता हे दोघे रमेश अण्णासाहेब जाधव यांच्याकडून घाऊक स्वरुपात गांजा विकत घेत असल्याचे माहिती उजेडात आली.
त्यानुसार पोलिसांनी रमेश जाधव याचा शोध घेऊन त्यास अहमदनगर जिल्ह्यातून 15 ऑक्टोबरला ताब्यात घेतले आहे.
तसेच आरोपी संतोष रामचंद्र वाळुंज, महेश राजु पंचारिया व रमेश अण्णासाहेब जाधव हे टोळी करून संघटितरित्या गांजा या अंमली पदार्थांची साठवणूक व विक्री करत असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नवनीत कावत यांनी मंगळवारी (दि. 20) दिली.
या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी तपास करीत आहेत.