औरंगाबादमध्ये तिघा तरुणांकडून पोलिसाला बेदम मारहाण

औरंगाबाद, दि. 9 – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे रुग्णालयात डॉक्‍टर दिवस-रात्र मेहनत असताना रस्त्यांवर पोलीसही चोवीस तास जागता पहारा देत आहेत. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्नशील असून ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र पोलिसांना काही ठिकाणी नागरिकांच्या बेशिस्त वर्तनाला सामोरे जावे लागत आहे. औरंगाबादमध्ये लॉकडाउनमध्ये अडवल्याने पोलिसांना लाठीने मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.

लॉकडाउन असल्याने शहरात अनेक ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. दिल्ली गेटजवळील सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास अण्णा भाऊ साठे चौकात पोलिसांना नाकाबंदी लावली होती. यावेळी एका दुचाकीवरुन तिघेजण प्रवास करत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण दुचाकीस्वार पळून जाण्यात यशस्वी ठरले. पण पोलिसांनी अडवल्याचा राग मनात असल्याने काही वेळाने तरुण आपल्या मित्रांना घेऊन तिथे पोहोचले आणि वाद घालण्यास सुरुवात केली.

आम्हाला अडवलं का ? असा जाब तरुण पोलिसांना विचारत होते. यावेळी वाद वाढला आणि एका तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याच्या हातातील लाठी खेचून घेत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी इतर पोलीस कर्मचारी आपल्या सहकाऱ्याची सुटका करण्याचा प्रयत्न करत होते.

यावेळी उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण तरुणांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. यानंतर तरुणांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.