किडनी दान करणाऱ्या महिलेला थेट पंतप्रधानांचे पत्र

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारा अवयव दानाला महादान संबोधल्याने प्रभावित झालेल्या एका महिलेने आपली किडनी दान केली. यामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या महिलेला पत्र लिहून प्रशंसा केली आहे.

या महिलेचे नाव मानसी हलदर (वय 48) असे असून त्या कोलकात्याच्या रहिवाशी आहेत. त्यांनी किडनी दान देऊन एका व्यक्‍तीला जीवदान दिले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या कार्याची दखल घेतल्याचे कळताच त्यांना आनंद झाला. निःस्वार्थ भावनेने केलेल्या त्यांच्या या कृतीचा पत्रात उल्लेख केला आहे.

हलदर यांनी पंतप्रधानांचे एक भाषण ऐकले होते, ज्यात मोदींनी अवयव दानाला महादान म्हटले होते. मोदींच्या भाषणाचा त्यांच्यावर फार प्रभाव पडला. त्यानुसार 2014 मध्ये त्यांनी आपली किडनी एका व्यक्‍तीला दान केली.

काही महिन्यांपूर्वीच हलदर यांनी पंतप्रधानांना याबाबत एक पत्र लिहिले होते. त्यांना या पत्राचे उत्तर आता मिळाले आहे.

या पत्रात पंतप्रधान लिहितात की, ‘तुम्ही माझ्या हृदयाला साद घातली आहे. तुम्ही खूपच महत्त्वाचे काम केले असून एक जीव वाचविला आहे. त्याग आणि सेवाभाव आपली संस्कृती आहे. तुमच्या निःस्वार्थ सेवेची जेवढी प्रशंसा केली जाईल तेवढी थोडीच आहे.’

पंतप्रधान म्हणाले होते की, अवयवदान एक महान दान आहे कारण यामुळे गरजवंताला नवे आयुष्य लाभते. आपल्या देशात असे लाखो लोक आहेत ज्यांना अशा अवयवांची गरज आहे. अवयव दानापेक्षा मोठे दान कोणतेही नाही.

मोदी यांनी लिहिले आहे की, ‘तुमचा सेवाभाव प्रेरणादायी आहे. यामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे अवयव दानासाठी अनेक व्यक्‍ती पुढे येऊन त्यांची अवयव दानाची कृती एका अभियानात रूपांतर होईल.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.