पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मतदान जजागृती कार्यक्रमाअंतर्गत पुण्यातील परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अधिकारी आणि कर्मचारी यांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्या निर्देशानुसार शहरातील विविध शासकीय कार्यालयात मतदान जागृती कार्यक्रम राबविला जात आहे.
यावेळी पुणे परिवहन महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते, सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार यांसह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख व कर्मचारी यांनी मतदानाचा हक्क बजाविण्याचा निर्धार व्यक्त करून प्रतिज्ञा घेतली. यावेळी हवेली तालुका तहसीलदार सूर्यकांत येवले आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदान जागृती कार्यक्रमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
आपला मतदानाचा हक्क बजावून आपण सर्वांनी लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सहभागी होऊया. तसेच आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांचे प्रबोधन करून जास्तीत जास्त मतदार मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवतील यासाठी प्रयत्न करूया. डॉ. संजय कोलते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी.