पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे, पिंपरी चिंचवड शहर व त्यालगतच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात प्रवाशांकरीता बससेवा पुरविण्यात येते. प्रवासासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरवासिया पीएमपीला प्रसंती देतात. याचा प्रत्यय सोमवारी (दि. 20) आला. पीएमपीने दैनंदिन उत्पन्नात 20 नोव्हेंबरला 2 कोटी रुपये उत्पन्न मिळविले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे, पिंपरी चिंचवड शहर व त्यालगतच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात प्रवाशांकरीता बससेवा पुरविण्यात येते. दिवाळीची सुट्टी संपत असल्याने परगावी गेलेले प्रवासी परत येत आहेत. त्यामुळे दोन्ही शहरातील मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी परिवहन महामंडळाच्या बस पूर्ण क्षमतेने व सर्व नियोजीत शेड्युल मार्गस्थ करणे बाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच महत्वाच्या बसस्थानकावर बससंचलनावर नियंत्रणासाठी व प्रवाशांना मार्गदर्शनासाठी आगार व्यवस्थापक यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या.
वाहतूक कोंडीचा विचार करता पीएमपीच्या ताफ्यात असणाऱ्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी इलेक्ट्रिक बस व सीएनजी बसचा वापर प्रवाशांनी वाढविला आहे. सोमवारी (दि. 20) मार्गावर 1698 बसेस संचलनात होत्या. तसेच जास्त उत्पन्नाच्या मार्गावरही जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यातून परिवहन महामंडळास 2,06,31,945 रुपये उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत जमा झाले. तर, एका दिवसात 12,23,087 प्रवाशांनी प्रवास केला.
मजूर, कामगार, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांनी पीएमपीच्या बससेवेवर नेहमीच विश्वास दाखवला आहे. त्याचबरोबर शहरातील शाळा व कॉलेज पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. दैनंदिन प्रवाशी संख्या व दैनंदिन उत्पन्नामध्ये झालेली वाढ ही प्रवाशांनी पीएमपीच्या बससेवेवर दाखविलेला विश्वास आहे. प्रवाशांनी पीएमपीच्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी इलेक्ट्रिक बस व सीएनजी बसेसचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पीएमपकडून करण्यात येत आहे.
20 नोव्हेंबरचे उत्पन्न
एकूण उत्पन्न – 2,06,31,945 रुपये
संचलनातील बस – 1698 बस
प्रवासी संख्या – 12 लाख 23 हजार प्रवाशांनी केला प्रवास