सातारा -महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे 62 वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सुरू झाली. सातारा उपकेंद्रात शाहू कला मंदिरमध्ये या स्पर्धेचे उद्घाटन लेखक डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते सोमवारी (दि. 20) झाले. प्रारंभी नटराज पूजन आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पर्धेला दूरस्थ पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
सांगली नाट्यस्पर्धेचे उपकेंद्र म्हणून सातारा येथे मागील वर्षापासून सुरु झालेल्या या नाट्य स्पर्धेमुळे जिल्ह्यातील, विशेषतः ग्रामीण भागातील नाट्य चळवळीला बळकटी मिळत आहे. गेली अनेक वर्षे साताऱ्यातील नाट्यसंस्थाना सांगली अथवा मिरज येथे स्पर्धेत सहभागी व्हावे लागत होते. त्यामुळे हौशी कलावंतांना आर्थिक भुर्दंड बसण्याबरोबर वेळेचाही अपव्यय होत होता.
ही बाब लक्षात घेऊन साताऱ्यातील रंगकर्मींनी एकत्र येऊन उपकेंद्र मंजूर करून घेतले. याबद्दल डॉ. राजेंद्र माने यांनी रंगकर्मींचे कौतुक करून, हौशी नाट्य स्पर्धा साताऱ्यात आयोजित केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले. कल्याण राक्षे प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सुजीत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी साताऱ्यातील रंगकर्मी परिश्रम घेत आहेत. शासनाने सांगलीचे उपकेंद्र म्हणून साताऱ्याला मान्यता दिली असली, तरी सातारा येथे मुख्य केंद्र मंजूर होण्यासाठी रंगकर्मी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहे.
उद्घाटनानंतर लगेचच आळजापूर येथील आधार सामाजिक विकास संस्थेने “अण्णांचे वस्त्रहरण’ या विनोदी नाटकाचा प्रयोग केला. उद्या, दि. 22 रोजी सातारा येथील आझाद हिंद प्रतिष्ठानच्या “एक्सपायरी डेट’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. ही स्पर्धा 4 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 7 ते 10 या वेळेत होणार आहे. सातारकर रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.