पुणे – शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेच्या प्रकल्प आराखड्यात सल्लागाराने केलेली चूक महापालिकेला तब्बल 52 कोटी 68 लाखांना पडली आहे.
या योजनेत जलवाहिन्या टाकण्याच्या कामात ट्रान्समिशन लाइनचा समावेशच केला नसल्याची बाब प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी लक्षात आली आहे. त्यामुळे या वाढीव कामाच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेने 52 कोटी 68 लाख रुपये कामाच्या निविदा मागवल्या आहेत. तर या चुकीची शिक्षा म्हणून पालिकेने सल्लागारास 5 लाखांचा दंड केला आहे.
या प्रकारामुळे एवढ्या मोठ्या प्रकल्पात अशी चूक झालीच कशी? असा सवाल उपस्थित केला जात असून समान पाणी योजनेचे काम दिलेल्या ठेकेदार कंपनीला मदत करण्यासाठी हा घाट घालण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. शहरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी आणि सध्या होणारी गळती थांबवण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. जवळपास 2 हजार 521 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. याद्वारे शहरात सर्वत्र लहान-मोठ्या व्यासाची नवीन पाइपलाइन, पाणी साठवण टाक्या आणि पाणी मीटर बसवले जाणार आहेत. योजनेसाठी पालिकेने 200 कोटीचे कर्जरोखे काढले असून,योजनेचे कामही सुरू आहे.
प्रशासन म्हणते..”ठेकेदाराची चूक’
या योजनेचा प्रकल्प आराखडा करताना सल्लागाराकडून ट्रान्समिशन लाइनचा खर्च योजनेत समाविष्ट करण्यात आला नसल्याने या निविदा काढण्यात आल्याचा खुलासा पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी केला आहे. या योजनेचा पहिला आराखडा तयार करताना जलवाहिन्यांची लांबी गृहीत धरण्यात आली होती.
तर, दुसरा आराखडा करताना लांबी तसेच वजन गृहित धरून आराखडा करण्यात आला आहे. मात्र,त्यात या योजनेच्या कामासाठी पूरक असलेल्या ट्रान्समिशन लाइनच गृहीत धरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हे वाढीव काम करण्यात येत असल्याचे पावसकर म्हणाले. तसेच या चुकीसाठी संबंधित सल्लागारास 5 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचेही पावसकर म्हणाले.