नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाषणादरम्यान पीएम मोदी भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि युद्ध टाळण्यासारखे मुद्दे झेलेन्स्कीसमोर मांडतील. याआधी 26 फेब्रुवारीला रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर पीएम मोदींनी पहिल्यांदा झेलेन्स्कीशी संवाद साधला होता.
रशिया-युक्रेन युद्धाचा आज 12 वा दिवस आहे. आत्तापर्यंत दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या पण त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. आज शांततेच्या प्रयत्नांबाबत दोन्ही देशांमध्ये तिसरी फेरी होणार आहे. दरम्यान, भारत सरकारच्या सूत्रांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार असल्याचं वृत्त समोर आले आहे.
यापूर्वी युक्रेननेही पंतप्रधान मोदींना मदतीचे आवाहन केले होते. पीएम मोदी या चर्चेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडणार आहेत. याशिवाय युद्ध टाळण्यासारख्या काही मुद्यांवर देखील चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.