पुणे – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे. हाच फॉर्म्युला पुणे महापालिका निवडणुकीसाठीदेखील अंमलात आल्यास जागा वाटपाचे सूत्र काय राहील व आपल्या वाट्याला किती जागा येतील, यावरूनच महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पुण्यातील नेत्यांसह इच्छुकांमध्ये धाकधूक आहे. एकत्र लढवण्याबाबत एकमत झाले, तरी जागा वाटपावरून पुन्हा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत पुणे शहरात आधी 11 आणि नंतर 23 अशी एकूण 34 नवीन गाव समाविष्ट झाली. त्यामुळे पुणे महानगरपालिका ही राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी पालिका झाली आहे. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये पुणेकरांना एकूण 173 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.
सध्या पुणे महापालिकेत भाजप सत्तेत आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविल्यास भाजपसाठी कडवे आव्हान ठरणार आहे. महाविकास आघाडीत शिवसेना घटक पक्ष असला, तरी शहरातील राजकीय स्तरावर मात्र तो तिसऱ्या क्रमाकांवर असून पक्षाचे 9 नगरसेवक आहेत. दुसऱ्या क्रमाकांवर कॉंग्रेस असून 10 नगरसेवक आणि पहिल्या क्रमाकांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस असून 41 नगरसेवक आहेत.
महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवायचे झाल्यास जागा वाटपासाठी विद्यमान नगरसेवकांची संख्या, गत निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नगरसेवकांची संख्या हेच सर्वसाधारण सूत्र राहील का?, असा प्रश्न आहे. त्यामुळे एकूण जागांच्या तुलनेत कॉंग्रेसच्या व नंतर शिवसेनेच्याही वाट्याला फारच कमी जागा येण्याची शक्यता आहे. त्यांना ती भीती तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडी केली तर हक्काच्या जागांवर पाणी सोडावे लागण्याची भीती आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय अद्याप तरी झालेला नाही. अंतिम निर्णय झाल्यास जागा वाटपाचे सूत्र काय राहील, कोणाच्या पारड्यात किती जागा पडतील, महापौर कोणाचा असणार असे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.