नवी दिल्ली – पॅलेस्टाईन प्रशासनाचे अध्यक्ष मेहमूद अब्बास यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फोनवरून चर्चा केली आणि अल-अलहली रुग्णालयात झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली. इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यानच्या संघर्षावर भारताची दीर्घकाळापासून असलेल्या भूमिकेचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
मध्यपूर्वेतील हिंसाचार, दहशतवाद आणि ढासळणाऱ्या सुरक्षाविषयक स्थितीबाबतही मोदींनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि पॅलेस्टाईन नागरिकांसाठी भारताकडून यापुढेही मानवतावादी मदत पाठवली जाईल, अशी हमी दिली.
गाझा पट्ट्यातील अल-आहिली रुग्णालयामध्ये बुधवारी रॉकेट पडल्यामुळे झालेल्या स्फोटात किमान 500 जण ठार झाले आहेत. या स्फोटावर आंतरराष्ट्रीय समुदायाने जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी ही घटना अतिशय धक्कादायक असल्याचे “एक्स’वरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “गाझामधील अल अहली हॉस्पिटलमध्ये झालेल्या दुःखद जीवितहानीबद्दल धक्का बसला. पीडितांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनःपूर्वक संवेदना आणि जखमी लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, सध्या सुरू असलेल्या संघर्षात नागरीकांची होणारी हानी ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. जे लोक यामध्ये सामील आहेत त्यांना जबाबदार धरले पाहिजे.”