नवी दिल्ली – सोशल मीडियावर सध्या एका चिमुकलीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडिओच्या माध्यमातून या चिमुकलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे चांगली शाळा बांधून देण्याची विनंती केली होती. जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील लोहाई मल्हार गावातील रहिवासी सीरत नाज या चिमुकलीने व्हिडिओमध्ये शाळेच्या इमारतीची झालेली दुर्दशेकडे साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर आता स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले असून चिमुकलीच्या शाळेत डागडुजी देखील सुरु करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे जम्मू-काश्मीर सरकारच्या शिक्षण विभागाला जाग आली. यानंतर जम्मूचे शालेय शिक्षण संचालक डॉ. रविशंकर शर्मा यांनी कठुआ जिल्ह्यातील या शाळेला भेट दिल्याचे देखील समजते. त्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने शाळेची इमारत बांधण्याचे काम सुरू केले आहे.
यानंतर चिमुकली सिरत आपल्या शाळेत सुरू झालेल्या कामामुळे खूप खूश असून पंतप्रधान मोदींचे आभार मानत आहे. अधिकाऱ्याच्या भेटीनंतर, सिरत नाझने आणखी एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये ती म्हणते,त्यांना मोदी सरांनी पाठवले होते आता ते आमची शाळा आणखी सुंदर करणार आहेत. तसेच वृत्तवाहिनीशी बोलताना सिरतने आपल्याला आयपीएस अधिकारी व्हायचे असल्याचे देखील सांगितले.
काय म्हणाली होती सिरत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये
व्हायरल व्हिडिओत मुलगी सुरुवातीला मोदीजींची विचारपूस करताना दिसते. “मोदीजी कसे आहात? तुम्ही ठीक आहात का? मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. मी लोहाईच्या सरकारी शाळेत शिकते. तुम्ही सर्वांचे ऐकता. आज माझे ऐका.” यानंतर ती शाळा दाखवते आणि म्हणते की, “ही आमची शाळा आहे. गेल्या पाच वर्षापासून किती घाणेरडी इमारत आहे. ही शाळेची बंद असलेली स्टाफ रुम आणि मुख्यध्यापकांची खोली आहे. आम्हाला येथे खड्डे पडलेल्या जमिनीवर बसावे लागते. येथे बसून आमचे कपडे खराब होतात, त्यामुळे आई ओरडते”, असेही ती म्हणते.
Please @narendramodi ji listen to the request of this school going girl from hilly region of lohai area of Tehsil lohai malhar of district kathua.@NirmalSinghBJP @districtadmkat1 @OfficeOfLGJandK @manojsinha_ pic.twitter.com/i5TlITgYJF
— Mohit Gupta (@factual_dogra) March 31, 2023
यावेळी ती शाळेतील वरचा मजला देखील दाखवते. येथेही वर्ग खोल्यांची दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळते. यानंतर ती शाळेचे गलिच्छ शौचालय दाखवते. त्यानंतर ती “आमची शाळा चांगली बनवा. खूप सुंदर शाळा बांधा”, अशी विनंती करते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता आणि याची संपूर्ण देशभर चर्चा देखील होती.