नवी दिल्ली – अमेरिकेतील कॅपिटल हिलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फटका बसला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावरील ट्रम्प यांचे अकाउंट बंद करण्यात आले आहे. मात्र यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फायदाच झाला आहे.
ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट निलंबीत करण्यात आले आहे. त्यामुळे ट्विटरवरील फॉलोवर्सच्या संख्येच्या बाबतीत पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या पुढे निघाले आहेत. आता ट्विटरवर पंतप्रधान मोदी सर्वाधिक फॉलोवर्स असलेले सक्रीय नेते बनले आहे. ट्रम्प यांच्या शेकडो समर्थकांनी शुक्रवारी कॅपिटल हिल येथे जमाव करून हिंसाचार केला होता. त्यानंतर त्यांचे ट्विटर अकाउंट निलंबीत करण्यात आले आहे. याचा लाभ मोदींना झाला आहे.
ट्विटरवर मोदींचे सध्या 64.7 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर ट्रम्प यांचे 88.7 दशलक्ष फॉलोवर्स होते. मात्र आता त्यांचे अकाउंट निलंबीत करण्यात आले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे ट्विटरवर 127.9 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. ओबामा ट्विटरवर सर्वाधिक फॉलोवर्स असणारे नेते आहे. मात्र ते सध्या राजकारणात सक्रिय नाहीत.
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे ट्विटरवर 23.3 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे 24.2 दशलक्ष फॉलोवर्स असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे 21.2 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. ट्रम्प समर्थकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये हिंसा भडकवल्याच्या दोन दिवसानंतर ट्विटरच्या वतीने ट्रम्प यांचे अकाउंट निलंबीत करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी केलेले ट्विट आणि त्यातील काही संदर्भ लक्षात घेऊन अकाउंट निलंबीत केल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले होते.