क्रीडारंग : सुविधांवर नव्हे कामगिरीवर बोला

-अमित डोंगरे

फुलराणी सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांच्यासह भारताचे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू थायलंडला सलग तीन स्पर्धा खेळण्यासाठी रवाना झाले आहेत. तिथे त्यांचा सरावही सुरू झाला असून आता ते आमुक सुविधा पाहिजेत, तमुक सवलती पाहिजेत अशी मुक्‍ताफळे उधळत आहेत. मुळात सुविधा तर मिळणारच आहेत पण कामगिरीवर कधी बोलणार.

भारताच्या बॅडमिंटन संघात या दोघींसह बी. साईप्रणित, किदाम्बी श्रीकांत, सात्विक साईराज, रांकी रेड्डी, अश्‍विनी पोनाप्पा व सीक्री रेड्डी असे सगळेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत. या स्पर्धेसाठी खेळाडू जेव्हा तिथे दाखल झाले तेव्हापासूनच सायना व सिंधूने तेथील सुविधांवर मते व्यक्‍त करायला सुरुवात केली. तसेच फिजीओ व प्रशिक्षक यांनाही सराव सत्रात उपस्थित राहण्याची परवानगी मागितली. एकतर जगभरातील करोनाचा धोका अद्याप कमी झालेला नसताना तसेच इंग्लंडमध्ये नव्या धाटणीच्या करोनाने पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली असताना जिथे कमीतकमी लोकांच्या उपस्थितीचे नियम लावले जातात तिथे या दोघी आपल्यासह सराव सत्रात सपोर्ट स्टाफलाही परवानगी देण्याची हास्यास्पद मागणी करत आहेत, याचे आश्‍चर्य वाटते. थायलंडला आपले खेळाडू सलग तीन स्पर्धा खेळणार आहेत. त्यातील पहिली स्पर्धा 12 ते 17 तर, दुसरी स्पर्धा 19 ते 24 आणि तिसरी स्पर्धा 27 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे.

जागतिक स्तरावरच्या मानाच्या समजल्या जात असलेल्या या स्पर्धेसाठी या खेळाडूंना ऑलिम्पिकच्या दृष्टीने योग्य सराव मिळणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय अत्याधुनिक सुविधांचा वापरही करता येणार आहे. मात्र, ज्या सुविधा उपलब्ध होत आहेत, त्याशिवाय आपल्या खेळाडूंनी काही अतार्किक मागण्या केल्या आहेत. आयोजकांनी त्यांच्या या मागण्या पूर्ण केल्या असल्या तरीही प्रश्‍न हा उरतो की, केवळ सुविधा आणि सवलतींवरच बोलणार का, प्रत्यक्ष कोर्टवर कामगिरीही सिद्ध करणार.

करोनाचा धोका असतानाही या स्पर्धेत तब्बल 800 पेक्षाही जास्त खेळाडूंनी प्रवेशिका दिलेल्या आहेत. आता ही स्पर्धा सुरू होत असल्याने अनेकांना त्यात खेळायचे आहे. मात्र, मर्यादित प्रवेशिकाच स्वीकारल्या जाणार असल्याने काही खेळाडूंना इच्छा असूनही त्यात सहभागी होता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. भारताच्या सायना,सिंधू यांच्यासह अन्य खेळाडूंना या तीनही स्पर्धांमध्ये सरस खेळ करत टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरण्याची संधी आहे. या दोघी यापूर्वीच पात्र ठरल्या असल्या तरीही त्यांना करोनामुळे स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळता आलेले नाही. त्यामुळे त्यांना या स्पर्धेतून चांगला सरावही मिळणार आहे.

बॅंकॉकमध्ये भारताच्या खेळाडूंना दुपारी 2 ते 3 इतका वेळ जिममध्ये व्यायाम, कसरतींसाठी दिला गेला आहे. तसेच संध्याकाळी 7 ते 8 हा एक तास सरावासाठी दिला गेला आहे. खरेतर हा एक तास आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंसाठी कमी आहे, हे मान्य पण जेव्हा स्पर्धेत इतक्‍या मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होत असतात आणि करोनामुळे सगळ्या नियमांचे काटेकोर पालन करायचे असेल तर एक तास देखील खूप आहे.

मात्र, आयोजकांची अडचण समजून घेण्याऐवजी आपला स्टारपणा सातत्याने दाखवायचे खूळ आपल्या बॅडमिंटनपटूंनाच नव्हे तर, क्रिकेटसह सर्वच क्रीडापटूंना आहे. सिंधू व सायनाने आयोजकांकडे आपल्या सरावाच्या वेळी फिजीओलाही उपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली असून खेळाडूंना त्यांचा सराव संपल्यावर आपल्याच रूममध्ये फिजीओला बोलवण्याची परवानगी दिली गेली आहे. यावरही आपल्या खेळाडूंनी नाराजी व्यक्‍त केली होती. अर्थात, असे लाड केवळ आपल्याच देशात चालून जातात. परदेशात खेळाडू कितीही मोठा असला तरीही त्याला नियमांच्या चौकटीतच राहावे लागते आणि खेळावे लागते. 

अमेरिकेतील एका टेनिस स्पर्धेत निराशेच्या तसेच रागाच्या भरात अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोवीचने टेनिस चेंडू बॅटने फटकावला व तो चेंडू महिला लाइनवूमनला लागला. तेव्हा रेफ्रींनी व आयोजकांनी त्याला स्पर्धेतून बाहेर काढले. त्याच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवला व त्याने या लाइनवूमनची माफी मागूनही त्याच्यावर कठोर कारवाई झाली. आपल्याकडे अशी कारवाई होईल का? असो.

किदाम्बी श्रीकांत हाच केवळ करोना काळात ऑक्‍टोबरमध्ये डेन्मार्क ओपन स्पर्धेत खेळला होता. तसेच लक्ष्य सेन देखील काही स्पर्धांमध्ये खेळला होता. सेनला स्पर्धेतून दुखापतीने माघार घ्यावी लागली आहे. तर, श्रीकांतचा सूर हरपला आहे. अशा स्थितीत साईप्रणीत व रांकी रेड्डी यांच्याकडूनच यशस्वी कामगिरीची अपेक्षा आहे. जर सायना व सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला तरीही त्यांच्यासाठी ते आत्मविश्‍वास वाढवणारे ठरेल. दुबई तसेच अन्य काही आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून सिंधूने माघार घेतली होती. ती इंग्लंडमध्ये सराव करत होती.

130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात या दोघीच सध्या जागतिक स्तरावर आपली कामगिरी सिद्ध करत आहेत. मात्र, गेल्या मोसमात या दोघींनाही सातत्याने सरस कामगिरी करता आलेली नाही. दरवेळी आमचे ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले जाते मात्र, तिथे पहिल्या किंवा फार तर दुसऱ्या फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात येते. जपानमध्ये होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकला आता जवळपास 200 दिवस बाकी आहेत. सायना व सिंधू या दोघींनीही ऑलिम्पिक पदके मिळवलेली आहेत, त्यामुळे यंदाही त्यांच्याकडून अशाच यशाची अपेक्षा आहे.

सिल्व्हरगर्लचा बसलेला शिक्‍का पुसून काढण्याचे सिंधूसमोर आव्हान आहे, तर दुसरीकडे फुलराणी म्हणून नावाजली जात असलेल्या सायनाकडून आणखी एका ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा आहे. या दोघींचे हे अखेरचे ऑलिम्पिक असल्याचे दिसत असून टोकियोत सुवर्णयश मिळवण्यासाठी आधी त्यांना थायलंडला होत असलेल्या स्पर्धा जिंकाव्या लागतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.