ह्युस्टन: करोनाबाधितांसाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करणे धोकादायक नाही, त्यातून कोणतेही साईड इफेक्ट संभवत नाहीत असा निष्कर्ष ह्युस्टन मेथडिस्ट हॉस्पिटलने या संबंधात संशोधन करून काढला आहे. या हॉस्पिटलनेही आता या थेरपीचा वापर करायला सुरुवात केली आहे.
करोना रोगापासून बऱ्या झालेल्या इसमाच्या रक्तातील प्लाझ्मा काढून तो गंभीर करोनाग्रस्त रुग्णाच्या रक्तात मिसळण्याची ही थेरपी आहे. या अभ्यासकांनी एकूण 25 पेशंटवर या थेरपीचा वापर केला होता. त्यातील 19 पेशंटवर त्याचा विधायक परिणाम दिसून आला आणि त्यातील 11 पेशंट बरे होऊन घरीही निघून गेले.
तथापि, या थेरपीच्या अधिक निर्धोक निष्कर्षासाठी अधिक पेशंटवर रॅंडम सॅम्पलिंग पद्धतीने उपचार करून त्याचे निष्कर्ष तपासले पाहिजेत, असेही या अभ्यासकांनी सुचवले आहे. करोनावर अजून खात्रीशीर औषध किंवा लस सापडली नसल्याने गंभीर करोनाग्रस्तांसाठी आता सर्रास ही पद्धत वापरण्यास अमेरिकेत अनुमती दिली जाण्याची शक्यता आहे. 2003 च्या सार्सच्या आणि 2009 च्या एच1एन1 साथीच्यावेळीही याच थेरपीचा वापर केला गेला होता.