पिंपरीत आत्तापर्यंत 55 टक्के रुग्ण झाले करोनामुक्त

43 टक्के रुग्ण सध्या सक्रिय; मृत्यूचे प्रमाण अत्यल्प

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवार (दि. 3) रात्री उशिरापर्यंत 313 रुग्ण करोनामुक्त झाले. एकूण 568 करोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत टक्केवारीमध्ये हे प्रमाण 55.11 टक्के इतके आहे. तर, सध्या करोनाचे 245 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांचे प्रमाण हे 43.13 टक्के इतके आहे. तसेच “करोना’मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अवघे 1.76 टक्के आहे.

शहरामध्ये करोनाचा पहिला बाधित रुग्ण 11 मार्चला सापडला. त्यानंतर 30 मार्चपर्यंत शहरात करोनाबाधित केवळ 12 रुग्ण होते. त्यातील 9 रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले. मात्र, 31 मार्चपासून रुग्ण वाढण्यास सुरवात झाली. एप्रिल अखेर शंभरी ओलांडत 116 रुग्ण झाले. सुरवातीला विदेशात जाऊन आलेल्या नागरिकांच्या थेट संपर्कातून करोनाची लागण झाली. त्यानंतर दिल्लीतील मरकज कनेक्‍शनमधून रुग्ण संख्या वाढली. मे महिन्यात करोनाचा संसर्ग झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाला.

त्यामध्ये प्रामुख्याने चिंचवडस्टेशन-आनंदनगर येथे करोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढले. गांधीनगर, भाटनगर, बौद्धनगर आदी झोपडपट्ट्यांमध्ये देखील करोनाचा शिरकाव झाला. शहरात मे महिना अखेरपर्यंत करोना बाधितांची संख्या 522 इतकी होती. ती रुग्णसंख्या वाढून थेट 568 रुग्णांपर्यंत पोहचली आहे.

मृत्यूचे प्रमाण 1.76 टक्के
शहरात करोनाची लागण झाल्यापासून जवळपास पावणेतीन महिन्यांच्या कालावधीत शहरातील एकूण 10 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. एकूण बाधित 568 रुग्णांच्या तुलनेत मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण फक्त 1.76 टक्के इतकेच आहे. ही चांगली बाब असली तरीही करोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी पुरेशा उपाययोजना आणि आवश्‍यक वैद्यकिय उपचार महापालिका प्रशासनाने करणे गरजेचे आहे.

“अ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सर्वाधिक रुग्ण
क्षेत्रीय कार्यालयनिहाय करोना रुग्णांची सद्य:स्थिती तपासली असता सर्वाधिक करोना बाधित रुग्ण हे “अ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या परिसरात आहेत. येथे एकूण 264 बाधित रुग्णांपैकी सध्या 120 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, 144 रुग्ण हे सक्रिय आहेत. तर, सर्वात कमी 15 बाधित रुग्ण ब क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या परिसरात आहेत. त्यातील 6 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. 8 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.