पाबळ -परप्रांतियांना त्यांच्या पाठवण्यासाठी येथील ग्रामपंचायतकडून मदतीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. ज्यांना गावी परतायचे आहे अशा व्यक्तींनी आपल्या कागदपत्रांसह कार्यालयाशी संपर्क साधण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
पाबळ व परिसरात विविध बांधकामे करणारे व मिळेल ती कामे करणारे मोठ्या संख्येने कामगार व मजूर आहेत. या मजुरांनाही आपापल्या गावी जाण्याची ओढ लागली आहे; मात्र तालुका स्तरावरील मजुरांची सोय झाल्याच्या बातम्या आल्याने ग्रामीण भागातील परप्रांतीय कामगारांमध्ये अस्वस्थता होती.
ग्रामपंचायत स्तरावर याबद्दल आरंभी अनभिज्ञता होती; मात्र आता ग्रामपंचायतकडून याबद्दल संपर्कासाठी सूचना करण्यात आल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. यासाठी पाबळचे मंडलाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी व ग्रामसेवकांची बैठक घेण्यात आली. या मजुरांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्यांची कागदपत्रे व संपर्क साधनासह स्थानिक संबंधितांना सहकार्य करण्यासाठी सुचवण्यात आले असून येत्या तीन चार दिवसांत हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव यांनी दिली.