जितेंद्र डुडी यांचे आवाहन
मंचर- मतदान केंद्रावर केवळ छायाचित्र मतदार चिठ्ठी ही ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरली जाणार नसून, त्यासोबत मतदार छायाचित्र ओळखपत्र, बॅंकेचे पासबुक, पॅनकार्ड, आधारकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका यापैकी एक ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे, अशी माहिती आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
आंबेगाव विधानसभा मतदार संघामध्ये सोमवारी (दि. 21) होणाऱ्या मतदानाच्या दिवशी विविध पक्षांना मतदान केंद्रापासून दोनशे मीटर अंतरावर आपले टेबल लावण्याची परवानगी दिली आहे. टेबलवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रविवारी (दि. 20) निवडणुकीच्या कामासाठी शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्द येथे कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी जुन्नर, खेड, शिरुर, हडपसर व भोसरी या ठिकाणांवरील संबंधित बसस्थानक व पीएमपीएमएल बसस्थानक येथून सकाळीसाडे पाच वाजता एसटी बसेसची सोय केली आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रमा जोशी यांनी दिली.