बीड : प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा. अन्यथा आम्हाला जर कोणी पैसे वाटताना दिसले तर त्याचे सरळ हातपाय तोडू’ असा इशारा बीड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी दिला. बीड शहरातील खंडेश्वरी मंदिर परिसरात पैसे वाटप करणाऱ्या सुरेश बन्सोडे यांस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
थेट पोलिस अधिकाऱ्यांसमोर संदीप क्षीरसागर यांनी हात-पाय तोडण्याची भाषा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बीड शहरात काका-पुतण्याचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी आव्हान उभे केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर खूपच आक्रमक झाले होते. त्यांनी आपला संताप प्रशासनावर व्यक्त केला. सोबतच उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याबाबत आग्रह केला. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी काकाना पराभव समोर दिसू लागल्याने पैसे वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पैसे वाटणारा आणि घेणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.
तसचं निवडणूक आयोगाकडे वारंवार तक्रारी देवून देखील असे प्रकार समोर येत असतील तर काय ?असा थेट सवाल केला. तुम्ही जर पैसे वाटणाऱ्यावर कारवाई करणार नसाल तर आम्हाला असे करताना जर कोणी दिसले तर त्यांचे हातपाय तोडू असा धमकी वजा इशारा क्षीरसागर यांनी दिला.