नव्या कृष्णा पुलावरील खड्डे “जैसे थे’

वाहनधारकांची कसरत; वाहतूक कोंडीत वाढ, प्रशासनाचे दुर्लक्ष

कराड  – कराड-विटा मार्गावरील कराड- सैदापूर दरम्यान असलेल्या नवीन कृष्णा पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. येथील जुना कृष्णा पूल बंद झाल्यापासून त्यानजीक असलेल्या नवीन पुलावरून सध्या दुहेरी वाहतूक सुरू आहे. वाहतुकीचा वाढता ताण, अतिवृष्टी आणि कामातील हलगर्जीपणा यामुळे नवीन कृष्णा पुलाची दुरवस्था झाली असून हे चित्र चार महिन्यानंतरही जैसे थे आहे. यावर अजून कसलेही उपाय योजना होत नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

कराड-विटा मार्गावर नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यात पावसाळ्यात कृष्णा नदीवरील जुना पूल वाहतुकीस धोकादायक झाल्यामुळे त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तसेच नजीकच्या नवीन कृष्णा पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात नदीला आलेल्या पुरामुळे जिर्ण झालेला जुना कृष्णा पूल कोसळला. त्यामुळे नवीन पुलावरून सुरू असलेली दुहेरी वाहतूक अजाही सुरू आहे. या पुलावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यात पुलावर खड्डे पडल्याने वाहतूकदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या पुलावरून कराड-विटा वाहतुकी व्यतिरिक्त कराड-वडूज, सैदापूर येथील विविध शाळा, महाविद्यालय व कराड- मसूर मार्गावरील वाहतुकीचीही मोठी भर पडते. त्यामुळे या पुलावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यात दुचाकी वाहनधारक, रिक्षाचालक यांच्याकडून वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असते त्यामुळे प्रवाशांच्या डोकेदुखीत आणखीन भर पडते.

सिग्नल ते कृष्णा कॅनॉल दरम्यान नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याची परिस्थिती आहे. यासंदर्भात नगरपालिका तसेच कराड शहर वाहतूक पोलीस यांच्याकडे वेळोवेळी नागरिकांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याकडे चालढकल करून गांभिर्याने न पाहिल्याने येथे दररोज वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येते. या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या समस्येकडे कराड शहर वाहतूक पोलीस यांनी तात्काळ लक्ष देऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच प्रामुख्याने वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी, रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.

अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व वादळी पावसामुळे बहुतांश ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र अजूनही येथील परिस्थिती आहे अशीच आहे. या रस्त्यांवरील खडी वरती आली असून वाहनांमुळे व वाऱ्याच्या झोतामुळे रस्त्यावर धुळीचे लोट उसळत आहेत. त्यामुळेही नागरिकांना श्वसनासह विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या पुलावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत अशी मागणी नागरिक प्रवासी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

अपघातात वाढ..
कृष्णा पुलावरून सुरू असलेली दुहेरी वाहतूक, वारंवार होणारी वाहतूक कोंडी, पुलावरील खड्डे, तसेच कृष्णा नाक्‍यावरून पुलावर प्रवेश करताना व कृष्णा कॅनॉलच्या बाजूस पुलावरून उतरताना तेथील धोकादायक परिस्थितीमुळे वारंवार अपघात होत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे कृष्णा नाका ते कृष्णा कॅनॉल व प्रत्यक्ष पुलावर किरकोळ अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.