महाबळेश्‍वरात दोन दुकाने फोडून तीस हजारांचा माल लंपास

महाबळेश्‍वर  – मुख्य बाजारपेठेलगत असलेल्या मरी पेठ परिसरातील चोरगे मोबाईल शॉपी व केरला बेकरी या दोन दुकानांच्या शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल शॉपमधील सहा मोबाईल फोनसह, रोख रक्कम तर केरला बेकरीतील रोख रकमेसह सीसीटीव्ही डीव्हीआर असा अंदाजे तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. हे दोन चोर केरला बेकरीमधील “सीसीटीव्ही’मध्ये कैद झाले असून पोलीस तपास करीत आहेत.

बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावरील मरी पेठ परिसरातील युनियन बॅंके शाखेजवळ नंदू चोरगे यांचे मोबाईल दुरुस्ती, विक्रीचे दुकान आहे. तर राजेश मार्तंड यांचे केरला बेकरी दुकान आहे. याबाबत नंदू चोरगे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास दुकान उघडण्यास आले असता शटर तुटलेल्या अवस्थेत दिसल्या. दुकानात जाऊन पाहणी केली असता दुकानातील नवीन व दुरुस्तीसाठी आलेले एकूण सहा मोबाईल एक नवीन हेडफोन तसेच दुकानातील गल्ल्यातील एक हजार रुपयांची रोख रक्कम असा अंदाजे 23 हजार रुपयांचा माल लंपास केल्याची माहिती फिर्यादीमध्ये दिली आहे.

मरी पेठ परिसरातीलच केरला बेकरीचे मालक राजेश मार्तंड यांच्या बेकरीमध्ये शटर तोडून सुमारे तीन हजार रुपयांची रोख रक्कम व सुमारे चार हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण सात हजार रुपयांचा माल चोरीला गेल्याची तक्रार महाबळेश्‍वर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मार्तंड यांच्या मोबाईलमध्ये बुधवारी मध्यरात्री चारच्या सुमारास दोन अज्ञात चोरटयांनी दुकानांमध्ये प्रवेश केल्याचे “सीसीटीव्ही’मध्ये कैद झाले आहे. पोलिस या सीसीटीव्ही फुटेजद्वारे अज्ञात चोरट्यांचा तपास करीत आहेत. एकाच रात्री दोन दुकानांमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले असून महाबळेश्‍वरातील व्यापारी धास्तावले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.