अनेकांनी सुरू केली निवडणुकीची तयारी; ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचनेचा आराखडा प्रसिद्ध झाला आहे. आता अनुसूचित जाती आणि जमाती व त्यातही महिला आरक्षणानंतर राजकीय नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे सोहळे रंगणार आहेत. शहरामध्ये तीन जागी अनुसूचित जमाती व 22 प्रभागांमध्ये अनुसुचित जातींचे आरक्षण असणार आहे. त्यामुळे आरक्षीत जागेवर अनेकांनी आतापासूनच तयारी चालविल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध करताना अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण जाहीर केले आहे. त्यामुळे ही आरक्षणे कुठल्या प्रभागात पडणार हे उघड झाले आहे. मात्र, या आरक्षणांचा विचार करता महिला आरक्षण कुठल्या प्रभागात असेल हे सोडतीनंतरच स्पष्ट होणार आहे. काही प्रभागांच्या अनुसुचित जातीच्या बड्या नेत्यांना त्यांच्या सोयीनुसार आरक्षण न मिळाल्यास त्यांना खुल्या प्रवर्गातून लढावे लागणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरासाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप आराखड्यामध्ये जाहीर केलेल्या लोकसंख्येच्या आधारे कोणत्या ठिकाणी अनुसुचित जाती व जमातींसाठी आरक्षण पडेल हे स्पष्ट झाले आहे. निवडणुकासाठी अनुसूचित जातीसाठी 22 ठिकाणी आरक्षण असणार आहे. तर अनुसूचित जमातीसाठी 3 प्रभाग राखीव असणार आहे. ओबीसी आरक्षणाचा निकाल लागला नाहीतर उर्वरित 114 जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे.
शहरातील 46 प्रभागातून 139 नगरसेवक होणार आहे, त्यामध्ये 70 महिला नगरसेवक असणार आहेत. त्यानुसार, अनुसुचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक 5, 6 व 41 या प्रभागांचा समावेश असणार आहे. तर प्रभाग क्रमांक 41 मध्ये अनूसुचित जाती व जमाती या दोन्हीसाठी आरक्षण असणार आहे. त्यामध्ये पिंपळे गुरव गावठाण, जवळकरनगर या भागांचा समावेश आहे. याठिकाणी एकूण लोकसंख्या 34 हजार 71 आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची संख्या 5 हजार 653 व अनुसूचित जमताची संख्या 2 हजार 333 इतकी आहे.