चंदीगड –भाजपने रविवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी यांच्याकडे सध्या पक्षात कोणतेही पद नाही तरीही ते पंजाबचा कॉंग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कसा जाहीर करू शकतात, असा सवाल भारतीय जनता पक्षाने केला आहे. भाजपचे नेते गजेद्रसिंह शेखावत यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडणे हा पक्षाचा विशेषाधिकार असला तरी पंजाबच्या लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की, गांधींना सध्या पक्षात काय अधिकार आहे, पक्षाच्या पराभवानंतर गांधींनी 2019 मध्ये कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर आजतागायत त्यांच्याकडे पक्षात कोणतेही अधिकृत पद नाही. केवळ गांधी आडनाव हे त्यांच्याकडे आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून कॉंग्रेसने सुनील जाखड यांना का वगळले, असा सवालही त्यांनी केला. ते केवळ एका विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून त्यांना कॉंग्रेसने या स्पर्धेतून वगळले काय, असा प्रश्न त्यांनी केला. याबद्दल कॉंग्रेस पक्षाने केवळ पंजाबमधीलच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेला स्पष्टीकरण दिले पाहिजे, असेही शेखावत यांनी म्हटले आहे.